Murder News: क्षुल्लक वादातून वरोऱ्यात हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Bhairav Diwase
वरोरा:- शहरातील केसरी नंदन गणपती जवळ झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाचा खून करण्यात आला. या घटनेने वरोरा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे अवघ्या काही तासातच आरोपीला अटक करण्यात यश आले.


मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान वॉर्ड, वरोरा येथील अमोल नवघरे (वय अंदाजे 35) आणि नितीन चुटे यांच्यात केसरी नंदन गणपती जवळ वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. वाद शमल्यानंतर नितीन चुटे साई मंगल कार्यालयाजवळ आले असता आरोपी अमोल नवघरे त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचला. तिथे त्याने धारदार शस्त्राने नितीन चुटेच्या शरीरावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन चुटेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री 8:15 च्या सुमारास घडली.


घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने सूत्रे फिरवली आणि आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी केलेल्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे, अवघ्या काही तासांतच आरोपी अमोल नवघरे याला वणी रोडवर अटक करण्यात आली. वरोरा पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक भस्मे, पो. का. सोनोने, नवघरे आणि प्रशांत नागोसे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.