Chandrapur News: तळोधी (नाईक) गावातील तिघांचा वेगवेगळ्या घटनांत एकाच दिवशी मृत्यू

Bhairav Diwase

चिमूर:- तालुक्यातील तळोधी (नाईक) गावात शनिवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. तळोधी नाईक येथील रामदास भोला नेवारे (वय ६५) हे शुक्रवारी बाजारासाठी जात असताना चिमूर-तळोधी मार्गावर त्यांचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम चिमूर उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर पुढील उपचारांसाठी नागपूर मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


परिधा राजू सहारे, ही इयत्ता सातवीची विद्यार्थिनी असून, तळोधी नाईक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून तिची तब्येत बिघडल्याने सुरुवातीला तिला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला ब्रम्हपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री उपचारांदरम्यान तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला.


तळोधी येथील मधुकर निखाडे यांना शनिवारी रात्री पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांना तत्काळ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रात्री त्यांचे निधन झाले.

तिन्ही मृतांवर रविवारी अंत्यसंस्कार

या तिन्ही मृतांचे मृतदेह रविवारी सकाळी तळोधी नाईक गावात आणण्यात आले. अर्ध्या अर्ध्या तासांच्या अंतराने तिघांच्याही अंत्यसंस्कार तळोधी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार पडले.