चंद्रपूर:- कोरपना तालुक्यातील सांगोडा गावात दालमिया सिमेंट कंपनीच्या जमीन अधिग्रहितवरून वाद निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी कंपनीच्या जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शवत, ग्रामपंचायतीने घाईघाईत मंजूर केलेला 'ना-हरकत' ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दालमिया सिमेंट या कंपनीच्या जमीन अधिग्रहणावरून गावात तणावाचे वातावरण आहे. कंपनीने आपल्या पुढील कामासाठी ग्रामपंचायतीकडून ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. यासाठी कंपनीने १ जुलै रोजी ग्रामपंचायतीला नोटीस दिली. ग्रामपंचायतने ही माहिती ग्रामस्थांना दिली, तेव्हा ग्रामस्थांनी हा ठराव मासिक सभेऐवजी ग्रामसभेत चर्चेसाठी घेण्यात यावा, अशी मागणी केली. ग्रामसभेत सर्व गावातील लोकांचा सहभाग असतो, त्यामुळे हा विषय सर्वांच्या हिताचा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. या मागणीसाठी १०० लोकांच्या सह्या घेऊन एक अर्ज सरपंच बोंडे यांना सादर करण्यात आला. मात्र, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत सरपंच आणि चार सदस्यांनी मासिक सभेतच हा ठराव घाईघाईने मंजूर केला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी हा निर्णय त्यांच्या हिताचा नसून, सरपंच आणि सदस्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करून विठोबा दिनकर बोंडे, शुभम संजय ढवस, रवींद्र भाऊराव देवाळकर, जयभारत धोटे, आकाश रागीट, निशांत पिंपळकर, गौरव पाचभाई आदींसह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यांनी हा मंजूर केलेला ठराव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे, अन्यथा कोरपना पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी तालुका आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सांगोडा गावातील हा वाद आता प्रशासनाच्या दारी पोहोचला आहे. पुढे यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.