Accident News: चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनानंतर भीषण अपघात; १८ जण जखमी

Bhairav Diwase

सिंदेवाही:- गणेश विसर्जनाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या नागरिकांवर रात्रीच्या वेळी काळी छाया पडली. रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ सुमारे ११:३० वाजता सिंदेवाहीजवळ हरणे राइस मिलसमोर एक भीषण अपघात झाला. गणेश विसर्जन संपवून परतणाऱ्या लोकांनी भरलेला पिकअप वाहन ट्रॅक्टरला धडकले आणि त्यात १८ जण जखमी झाले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, MH 34 DG 0020 क्रमांकाच्या पिकअप वाहनाचा चालक विशाल दादाजी भरड़कर हा नशेत वाहन चालवत होता. विसर्जनानंतर राम मंदिर चौकातून तो काही नागरिकांसह सिंदेवाहीकडे परतत असताना पुढे चाललेल्या ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरला जोरदार धडक दिली. त्यात पिकअपमधील १८ जण जखमी झाले, त्यापैकी काही जण गंभीर होते.


अपघाताची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत चालकाने मद्यपान केले होते, हे स्पष्ट झाले. चार ते पाच जखमींवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू असून उर्वरितांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.


पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश मेश्राम हे पुढील तपास करत आहेत. मद्यधुंद वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


घटनेतील जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
हर्षल बाबूराव वेठे, प्रणय रवींद्र कासेवार, सचिन अशोक भरड़कर, सुरेश गोसाई भरड़कर, विवेक सोमाजी भरड़कर, राजेंद्र पुनाजी अरडपहारे, ईशान नितीन सहारे, चेतन बंडू भरड़कर, हेमंत तुळशीराम भरड़कर, विद्या सोनवणे, विशाल दादाजी भरड़कर (चालक), नागेश भरड़कर, नयन भरड़कर, मिलिंद चावरे, पियुष मस्के, कृष्णा जुमडे, आनंद भरड़कर आणि विजय भरड़कर.