चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू होते. दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भटाळी पूल इरई नदीच्या पात्रातही विसर्जनाची लगबग सुरू होती. याचवेळी, बेताल चौक, दुर्गापूर येथे राहणारा १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक हा आपल्या मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेला होता.
दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दीक्षांत आणि त्याचे मित्र भटाळी पुलाजवळ इरई नदीच्या पात्रात उतरले. विसर्जन करत असताना दीक्षांत आणि एका मित्राचा तोल गेला. त्यावेळी, दुसऱ्या मुलाला वाचविण्यात यश आले, मात्र दीक्षांत बुडाल्याने तो पाण्याबाहेर येऊ शकला नाही.
ही घटना लक्षात येताच तात्काळ दुर्गापूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली, परंतु रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे ७ सप्टेंबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली असता, सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला दीक्षांतचा मृतदेह आढळला. या दुर्दैवी घटनेमुळे दुर्गापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.