Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

रोजगार हमी योजना राबविण्यात सावली तालुका अग्रेसर saolinews saoli

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- शेतीशी निगडित कामे संपल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांना रोजगार नसतो. त्यामुळे कामासाठी इतर राज्यात मजुरांना कामे शोधण्यासाठी भटकावे लागत असते.स्थानिक पातळीवर गावातच काम मिळवून देण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देणारी महाराष्ट्र राज्य सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अस्तित्वात आणली. या योजनेच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण झाला आहे.ही कल्याणकारी योजना ठरत असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हजारो मजुरांना काम मिळवून देणारी सावली पंचायत समिती जिल्ह्यात अग्रेसर ठरली आहे.
मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. या योजनेची निर्मिती प्रथम महाराष्ट्रात झाली.या योजनेतून सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध होतात. ग्रामिण जनतेची मान उंचावून अकुशल कामे मिळवून देणारी योजना आहे. या योजनेने स्थानिक स्तरावर काम उपलब्ध करून दिली आहे. मागेल त्याला रोजगार असे या ब्रिद या योजनेचे आहे. ग्रामपंचायतकडे मागणी करायची असते. पंधरा दिवसात अर्जदारांना ग्रामपंचायत काम मिळवून देते. त्यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांचा आर्थिक स्त्रोत वाढविण्यात मदत होते. त्यामुळेच या योजनेला लोककल्याणकारी योजना असेही म्हटले आहे.
ही योजना मजुरांसाठी वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत शेतीशी निगडित कामे केली जातात. जलसंधारण, पर्यावरणपूरक कामे,बंधारे,शेततळे, शोषखड्डे, मजगी,नाला खोलीकरण, आदी कामे केली जातात. कोल्हापूरी बंधारे बांधल्याने आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात १५० दिवस रोजगार मिळतो. हा रोजगार मिळवून देण्यात सावली पंचायत समितीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सावली पंचायत समितीमध्ये ४८ ग्रामपंचायतीत कामे सुरू आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना जिव्हाळ्याची योजना ठरली आहे.
फरवरी महिन्यात सावली पंचायत समितीने १० हजार २२८ नागरिकांना रोजगार मिळवून दिला. चिमूर ७ हजार ८२६,नागभीड ७ हजार ५०५,मुल ७ हजार १७५,ब्रह्मपुरी ६ हजार ९२६,सिंदेवाही ६ हजार ८२६,जिवती ५ हजार ७१४,पोंभूर्ण ५ हजार ३५८,भद्रावती २ हजार १६३, गोंडपिपरी २ हजार १२०, राजुरा १ हजार ११०,चंद्रपूर १ हजार ३०१,कोरपना ७७८,बल्लारपूर तालुक्यात ६८५ मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं चा),सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक कार्यक्रम अधिकारी यांच्या प्रयत्नातून काम मिळून दिले जाते. तालुक्यात दहा हजारांहून अधिक मजुरांची उपस्थिती असून,वेळेत मजुरीही दिली जात आहे. यात तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत