Top News

नागरिकांनी स्वाधीन केलेल्या ६८ भरमार बंदुका #chandrapur #gadchiroli



गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असतात. शिकार करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात.

अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागांतील नागरिकांनी त्यांच्याकडे बाळगलेल्या ६८ भरमार बंदुका व १२ बॅरल पोलिस दलाच्या स्वाधिन केल्या.

डिसेंबर-२०२२ मध्ये उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उप पोलिस स्टेशन दामरंचा 20 भरमार, उप पोलिस स्टेशन रेपनपल्ली 05 भरमार, पोस्टे जिमलगट्टा 02, उपविभाग अहेरी अंतर्गंत उपपोस्टे पेरमिली 15 भरमार व 03 बॅरल, पोस्टे मुलचेरा 02 भरमार, उपपोस्टे राजाराम (खां.) 12 भरमार व 9 बॅरल, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत 08 भरमार, पोलिस मदत केंद्र गोडलवाही 04 भरमार बंदुका पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आल्या आहेत.

भरमार बंदुका जमा केल्यामुळे नक्षलवादी जे सामान्य नागरिकांचा चळवळीसाठी वापर करत होते व सोबत भरमार बंदुका बाळगल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होता, त्यास आळा बसला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कामगिरीकरिता परिश्रम घेणा-या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असून जिल्ह्यातील आणखी काही नागरिकांकडे भरमार बंदुका असल्यास त्यांनी आपले जवळचे पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र येथे स्वाधीन करावे, आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने