Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

साहित्य क्षेत्राने राजकीय क्षेत्रावर वचक ठेवावा:- हंसराज अहीर #chandrapurचंद्रपूर:- राजकीय वक्तव्यापेक्षा साहित्यिकांच्या वक्तव्याला लोक गांभीर्याने घेतात. राजकीय नेत्यांचे म्हणणे कोणी फारसे मनावर घेत नाहीत. त्यामुळे साहित्य क्षेत्राने राजकीय क्षेत्रावर वचक ठेवावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.

नागपुरी येथील ‘स्वरवेध’ निर्मित पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संमेलनाध्यक्ष वि. स. जोग, आमदार किशोर जोरगेवार, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर उपस्थित होते.

आमदार म्हणून मी सदैव तत्पर असून जी मदत हवी असेल, त्यासाठी पाठीशी राहील अशी ग्वाही आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिली. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, चिंतामणी ग्रुप ऑफ एज्यूकेशनचे प्रशांत दोंतुलवार यांचा सत्कार करण्यात आला. आ. किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.

'गझल मुशायरा' कार्यक्रम रंगला

'गझल मुशायरा' हा कार्यक्रम चांगलाच रंगला. या सत्रात एकाहून एक सरस अश्या मुशायरा सहभागी मान्यवरांनी सादर केल्या. 

'दिखावटी या कळ्या फुलांचे दुकान केले,

मुळातले गंध, रंग तू बंदिवान केले ..

'मुशायरा' सत्राचे अध्यक्ष असणाऱ्या शिवाजी जवरे यांनी सादर केलेल्या या मुशायरेने रसिकांची मने जिंकली. अनंत नांदूरकर यांनी संचालन केले, आभार प्रदर्शन इरफान शेख यांनी केले.


विदर्भ साहित्य संघाचे सोनेरी पान म्हणजे मनोहर म्हैसाळकर

चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर - मनोहर म्हैसाळकर यांच्स विदर्भ साहित्य संघ हा श्वास होता. कुशल प्रशासक, माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती. शताब्दी महोत्सव ४ महिन्यावर आलेला असतांना ते आपल्याला सोडून निघून गेले ही दु:खद बाब असून विदर्भ साहित्य संघाचे सोनेरी पान म्हणजे मनोहर म्हैसाळकर असल्याचा सूर 'आठवणीतले मनोहर म्हैसाळकर' या कार्यक्रमात वक्त्यांच्या बोलण्यातून उमटला.

विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या आठवणीना उजाळा देणारा 'आठवणीतले मनोहर म्हैसाळकर' या विशेष कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. शरदचंद्र सालफळे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, वणी येथील माधव सरपटवार सहभागी झाले.


'अनुभवकथन' हे सत्र गाजले

'अनुभवकथन' हे सत्र विशेष गाजले. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार व लेखिका डॉ. सुजला शनवारे- देसाई सहभागी झाले होते. 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' चे डॉ. सतीश गोगुलवार यांनी आपल्या सुरुवातीपासूनच्या काळातील काही बाबी सांगितल्या. मी याच चंद्रपूर मातीतला होतो. मोठा भाऊ अभियंता ,तर मी वैद्यकीय क्षेत्रात गेलो. पण मला डॉक्टर मुळीच व्हायचे नव्हते. पण प्रवेश मिळाला व तिकडे वळलो. दोन सामाजिक चळवळीत जुळलो. त्यात एक ही बाबा आमटे यांच्या सोमनाथ येथोल श्रमसंस्कार छावणीत गेलो. त्याचा प्रभाव होता असे सांगितले.

'आम्ही फौजी' च्या लेखिका सुरुवातीचा प्रवास सांगतांना म्हणाल्या की, डॉ. सुजला शनवारे-देसाई म्हणाल्या की, लष्करात जेथे' पोस्टिंग ' असेल तेथे सर्व सण एकत्रितपाणे साजरे केले जातात. जात-पात माहित नसते, फक्त सर्व जण हिंदुस्थानी असतात. आम्ही सामुहिकतेने राहतो. असे आवर्जून सांगितले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत