Top News

झाडीपट्टीच्या नाटकांना मरण नाही #chandrapur


विदर्भ साहित्य संमेलनातील चर्चेतील सूर


चंद्रपूर:- चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर-झाडीबोली व झाडीपट्टीतील नाटकांचा सहसंबंध आहे आणि राहणारच आहे. झाडीबोलीनेच झाडीपट्टीच्या नाटकांना लोकचळवळीचे रूप दिले आहे. ही परंपरा झाडीबोलीतून निर्माण झाली असली तरी ती केवळ झाडीपट्टीत स्थिरावली, असे नाही. तर थेट सार्क परिषदेपर्यंत पोहाचली आहे. या नाट्य संस्कृतीवर झाडीपट्टीच्या लोकांची प्रचंड निष्ठा आहे आणि म्हणून या नाटकांना मरण नाही, असा सूर विदर्भ साहित्य संमेलनातून उमटला.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात विदर्भ साहित्य संघाचे ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या ‘झाडीबोली आणि झाडीपट्टीतील नाटकांचा सहसंबंध’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजन जयस्वाल, तर वक्ते म्हणून धनराज खानोरकर, गजानन कोंर्तलवार, जनबंधू मेश्राम उपस्थित होते.

दिवाळी ते होळीपर्यंत चालणारा हा झाडीपट्टीच्या नाटकांचा हंगाम असतो. जवळपास १५० वर्षांची परंपरा त्यास आहे. झाडीपट्टीचा माणूस नाटकात जन्मतो आणि नाटकातच मरतो. दिवसा मंडई आणि रात्री नाटक असा लोकोत्सवच या भागात असतो. मराठी रंगभुमीचे मकरंद अनासपुरे यांच्यासारखे प्रतिथयश कलावंत एव्हाना झाडीपट्टीचे नाटक करायला येतात. जवळपास १०० कोटींची उलाढाल होते. या नाटकातून रंजन व प्रबोधन मिळेल, असा येथील रसिकांचा विश्‍वास आहे आणि म्हणून तो रात्रभर नाटक टकटक बघतो. लावणी या नाटकाचा गरम मसाला आहे. नाटकातील पात्र झाडीबोलीतून बोलतात म्हणून प्रेक्षकांना हे नाटक आपलेसे वाटते. एकीकडे शहरातील ‘थिएटर’ ओस पडत आहेत, तर झाडीपट्टीत एकाच दिवशी आठ नाटक यशस्वी होत आहेत, अशी माहिती धनराज खानोरकर यांनी दिली. जनबंधू मेश्राम यांनीही झाडीबोली आणि झाडीपट्टीतील नाटकांचा सहसंबंध असल्याचे मत व्यक्त केले. गजानन कोंतर्लावार यांनी मात्र, आजकाल झाडीबोलीत प्रमाणभाषेत शिरकाव झाल्याचे सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने