Top News

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव, पाणी आणि पर्यावरण' या चर्चासत्र #chandrapur


त्यासाठी दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज -चर्चासत्रातील सूर


चंद्रपूर:- चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे साहित्य परिसर, चंद्रपूर - चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाची देणगी आहे. पण मागील काही वर्षात येथील पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होतांना दिसत असून मानव-वन्यजीव संघर्षासह येथील प्रदूषण वाढले आहे. वन्यजीवांच्या एकूणच जीवनशैलीत अलीकडे बदल झाला असून वाढता संघर्ष बघता दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचा सूर चर्चासत्रातील वक्त्यांच्या बोलण्यातून उमटला.

चंद्रपुरातील ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनात रविवारी ‘चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव, पाणी आणि पर्यावरण या विषयावर आयोजित चर्चासत्रात वक्ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे हे होते, तर इको-प्रो चे बंडू धोतरे, माजी नगरसेवक संजय वैद्य, भूगोल अभ्यासक डॉ. योगेश्वर दुधपचारे हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना बंडू धोतरे म्हणाले की, जिल्ह्यात अलीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला असून शिगेला पोहचला आहे. या वर्षात मागील ५ वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या प्रथमच ५० वर पोहचली आहे. यासाठी वन्यजीवांच्या जंगलातील त्याच्या हालचालींचा अभ्यास करण्याची गरज आहे. निदान न करता आपण कृती करणे अयोग्य असून प्रदूषित चंद्रपूर बघता येथे जंगलांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाघाचे कॉरीडोर सुरक्षित राहण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.

माजी नगरसेवक तथा जलबिरादरीचे संयोजक संजय वैद्य म्हणाले की, पाण्याचे अन्यन्यसाधारण महत्व आहे. देवाचे स्वरूप पाण्याला दिले गेले आहे. पाणी संपत चाललेले आहे. पाण्याच्या जागृतीच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्यात कधीच मागे नव्हता. पण आज चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता स्थिती गंभीर झाली झाल्याचे नमूद केले.

शहरातील प्रदूषण प्रचंड वाढलेले असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यासाठी ताबडतोब कायद्यात बदलाची गरज असल्याचे डॉ. योगेश्वर दुधपचारे म्हणाले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना देवेंद्र गावंडे म्हणाले की, जंगलाचे फायदे-तोटे आहेतच, पण त्यात आज आपण तोटेच बघत आहोत. असे सांगतांना संघर्षाबाबतीत लिखाणाच्या माध्यमातून आपण जाणीव-जागृती करू शकलो नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप देशमुख यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने