Janvikas Sena : अट मान्य करा नाहीतर..! जनविकास सेनेचा इशारा

Bhairav Diwase
चंद्रपूर:- काँग्रेससोबत आघाडी करून तीन जागांवर विजय मिळवणाऱ्या स्थानिक जनविकास सेनेने, भाजप पाठोपाठ काँग्रेस घेरण्यास सुरवात केली आहे. तसं झालं नाही, तर आम्ही वेगळा विचार कर, असा इशारा दिला आहे. तसंच उपमहापौरपदासाठी निश्चित केलेल्या उमेदवाराची माहिती दिली नसल्याचे सांगून, नाराजी व्यक्त केली आहे.

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस समर्थन असलेली जनविकास सेनेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला सत्तेचा आकड्याजवळ जाण्यासाठी जनविकास सेनेची गरज आहे. निवडणुकीत काँग्रेसने जनविकास सेनेला पाठिंबा दिला होता. पण चंद्रपूर महापालिका निवडणुकीत, महापौरपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली आहे. यातच जनविकास सेनेने देखील आक्रमक भूमिका घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे.


महापौरपदाच्या भूमिकेवरून, काँग्रेसमध्ये चाललेल्या गटबाजीवरून, जनविकास सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांनी, 'आम्हाला कोणतेही पद नको. मात्र आम्हाला विश्वासात घेऊन, भ्रष्ट उमेदवार टाळून, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार काँग्रेसने द्यावा, एवढीच अपेक्षा आहे. तसे न झाल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल,' असा इशारा दिला.


दरम्यान, काँग्रेसला चंद्रपूरमधील महापालिकेत रोखण्यासाठी भाजपने देखील तिरकी चाल खेळली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला, सत्तेत येण्याची लालूच दिली आहे. शिवसेना ठाकरे सेनाला सत्तेत येण्याचा प्रस्ताव देण्याबरोबर सव्वा-सव्वा वर्षांसाठी महापौरपद वाटून घेऊ, असा प्रस्ताव दिला आहे. पण सत्तेत पहिले महापौरपद भाजपला हवे, असा हा प्रस्ताव आहे. यावर शिवसेना ठाकरे सेनेकडून काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.


याशिवाय पाच वर्षांच्या कालावधीत दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाचीही ऑफर भाजपने शिवसेना ठाकरे सेनेला दिली आहे. या प्रस्तावाची चर्चा सुरू असताना, काँग्रेस समर्थन असलेल्या जनविकास सेनेने काँग्रेससमोर अट ठेवून अडचणी वाढवल्या आहेत.


शिवसेना ठाकरे सेना चंद्रपूर महापालिकेत 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहे. काँग्रेस 27, काँग्रेस समर्थन असलेल्या जनविकास सेनेला तीन, भाजप 23, शिवसेना ठाकरे सेना पक्ष सहा, वंचित आणि अपक्ष प्रत्येकी दोन, बसपा, AIMIM आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला प्रत्येकी एक, असे बलाबल आहे.