Chandrapur: महाधमाका! चंद्रपूर पालिकेत भाजपचा राजकीय चमत्कार; चंद्रपूर महानगरपालिकेत कमळ फुलले!

Bhairav Diwase

नशिबाचा खेळ! उपमहापौर पदाचा निकाल 'ईश्वर चिठ्ठी'ने; भाजप-ठाकरे युतीचा उमेदवार विजयी
चंद्रपूर:- महानगरपालिकेच्या राजकारणात आज असा काही 'ट्विस्ट' आला की संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे वेधलं गेलं. ज्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार असं वाटत होतं, तिथे भाजपने ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करत सत्तेचं गणितच बदलून टाकलं आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित मुसंडी मारली आहे. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव केला. या विजयाने काँग्रेसच्या गोटात स्मशानशांतता पसरली आहे, तर भाजपमध्ये जल्लोष सुरू आहे.


काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा (वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर गट) फटका पक्षाला बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसच्या वैशाली महाडोळे आणि त्यांचे मित्र पक्ष पप्पू देशमुख यांना या पराभवाचा सामना करावा लागला.


निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर MIM ने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. यामुळे बहुमताचा आकडा खाली आला. पण सर्वात मोठा धक्का बसला तो उपमहापौर निवडीत. उपमहापौर पदासाठी दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे ३२-३२ मते मिळाली. अखेर 'ईश्वर चिठ्ठी' काढण्यात आली आणि नशिबाने साथ दिली ती ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांना!


राज्याच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेले भाजप आणि ठाकरे गट चंद्रपुरात मात्र सत्तेसाठी एकत्र आले आहेत. सव्वा-सव्वा वर्षांच्या महापौर पदाच्या फॉर्म्युल्यावर ही युती झाल्याची चर्चा आहे. पण या निकालाने काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.