Chandrapur News: "भाऊ, काम झालंय...!" राहुल पावडेंचा मुनगंटीवारांना थेट कॉल!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा पेच अखेर सुटला आहे, पण या निवडीमागे जे नाट्य घडलं ते एखाद्या फिल्मी थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं. जेव्हा उद्धवसेना महापौर पदावर अडून बसली होती आणि महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता, तेव्हाच एक अनपेक्षित युती आकाराला आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी आता एका खळबळजनक भेटीचा खुलासा केला आहे. ही भेट कोणत्याही आलिशान कार्यालयात नाही, तर चक्क रस्त्यावर एका कारमध्ये झाली!

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आणि नगरसेवक राहुल पावडे एका कारमध्ये जवळ चर्चा करताना दिसत आहेत. याच कारमध्ये सत्तेची सर्व समीकरणं जुळली. हरिश शर्मांच्या दाव्यानुसार, संदीप गिऱ्हे यांनी भाजपचा प्रस्ताव मान्य केला आणि एका पेपरवर स्वाक्षरी केली. विशेष म्हणजे, ज्यावेळी ही स्वाक्षरी होत होती, तेव्हा भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे स्वतः हरिश शर्मांच्या संपर्कात होते.


हरिश शर्मा संदीप गिऱ्हे आणि आमची भेट रस्त्यात कारमध्ये झाली. तिथेच आम्ही सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवला. पहिले सव्वा वर्ष भाजपचा महापौर आणि उद्धवसेनेचा उपमहापौर, तर दुसऱ्या टप्प्यात पदं अदलाबदल होतील. हे सर्व ठरल्यानंतर राहुल पावडेंनी मुनगंटीवार साहेबांशी बोलताना 'काम झालंय' असा सिग्नल दिला."


या गुप्त कराराचा निकाल असा लागला की, मंगळवारी सकाळी मतदानाच्या काही वेळ आधीच सर्व चित्र स्पष्ट झालं. भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौर पदी निवड झाली, तर उद्धवसेनेचे प्रशांत दानव उपमहापौर बनले. काँग्रेसमधील गटबाजी आणि उद्धवसेनेची भाजपला मिळालेली साथ यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.


या संपूर्ण घडामोडींचे श्रेय आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले जात असून, कारमधील त्या 'सही'ने चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेची चावी अखेर भाजप आणि उद्धवसेनेच्या हाती सोपवली आहे.