Chandrapur fire News: चंद्रपुरात आगीचे तांडव! बायपास रोडवरील डंपिंग ग्राऊंडला भीषण आग

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शहराच्या कचऱ्याचा प्रश्न आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. चंद्रपुरातील बायपास रोडवर असलेल्या मुख्य डंपिंग ग्राऊंडला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भयानक आहे की, मागील ६ तासांपासून अग्निशमन दल यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

चंद्रपूर शहराचा संपूर्ण कचरा ज्या बायपास रोडवरील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो, तिथे रात्री अचानक ठिणगी पडली आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. कचऱ्यामध्ये प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने ही आग वेगाने पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली धुमसणाऱ्या आगीमुळे ती विझवण्यात अनेक अडचणी येत आहेत.


सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे या डंपिंग ग्राऊंडच्या अगदी बाजूला मोठी नागरी वस्ती आहे. या भीषण आगीमुळे परिसरात दाट आणि विषारी धूर पसरला असून, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे वस्तीतील लोकांमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अग्निशमन दलाचे जवान अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या आगीचा वस्तीला धोका पोहचू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.