चंद्रपूर:- राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही! ज्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर होईल असं वाटत होतं, तिथे चक्क 'कार'मध्ये बसून सत्तेचं समीकरण बदललं गेलं. ना ऑफिस, ना हॉटेल; थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये महापौरपदाची 'खिचडी' शिजली आणि भाजप-ठाकरे गट एकत्र आले!
हो, हे खरंय! महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काही तास उरले असताना, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांची भेट चक्क रस्त्यावर एका कारमध्ये झाली. सत्तेच्या पेचात अडकलेल्या चंद्रपूरमध्ये याच कारमधील चर्चेने सव्वा-सव्वा वर्षांचा नवा फॉर्म्युला जन्माला घातला.
पहिले १.२५ वर्ष: भाजपचा महापौर + उद्धवसेनेचा उपमहापौर
पुढील १.२५ वर्ष: उद्धवसेनेचा महापौर + भाजपचा उपमहापौर
खरं तर, मतमोजणीच्या दिवसापासूनच संदीप गिऱ्हे यांनी महापौरपदावर दावा केला होता. त्यांनी काँग्रेस नेत्यांसोबतही अनेक बैठका केल्या. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महापौरपद देण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिथेच काँग्रेसचा खेळ बिघडला.
या अनपेक्षित युतीमुळे भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या, तर उद्धवसेनेचे प्रशांत दानव उपमहापौर बनले. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ज्या उद्धवसेनेने महाविकास आघाडीत राहून भाजपला प्रखर विरोध केला, त्यांनीच चंद्रपुरात भाजपशी हातमिळवणी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास या 'कारमधील चर्चे'ने हिरावून घेतला आहे. आता ही नवीन युती चंद्रपूरचा विकास कशी करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

