चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून भाजपचा झेंडा तर फडकला, पण विजयाचा हा गुलाल सुकण्यापूर्वीच पक्षांतर्गत गटबाजीने जोर धरला आहे. नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांनी आज आपला पदभार स्वीकारला, मात्र या आनंदाच्या प्रसंगी भाजपमधील एक मोठा गट अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चंद्रपूरच्या महापौरपदी निवड झालेल्या संगीता खांडेकर यांचा आज पदग्रहण सोहळा पार पडला. राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खांडेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसून सूत्रे स्वीकारली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र, हा आनंद सर्वसमावेशक नव्हता.
स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना या अधिकृत कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचा खळबळजनक आरोप जोरगेवार गटाने केला आहे. या अपमानाचा निषेध म्हणून आमदार जोरगेवार समर्थक असलेल्या तब्बल १७ नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भाजपचेच नगरसेवक आपल्याच महापौरांच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

