ब्रम्हपुरी:- कुटुंबातील क्षुल्लक वादातून मद्यपी कंत्राटी शिक्षक मुलाने वडिलाच्या डोक्यावर लोखंडी सबलीने वार करून हत्या केली. ही खळबळजनक घटना तालुक्यातील डोर्ली येथे गुरुवारी (दि. ५) रात्री ९ वाजता घडली. दादाजी बक्षी ठाकरे (६५) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी किशोर दादाजी ठाकरे (४०) याला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर ठाकरे हा जिवती येथील एका आश्रमशाळेत कंत्राटी शिक्षकपदावर कार्यरत आहे. मात्र, दारूच्या व्यसनामुळे काही महिन्यांपासून कर्तव्यावर जाणे बंद केले. दारूच्या नशेत पत्नीशी वारंवार वाद होत असल्याने ती काही दिवसांपर्ती माहेरी निघून गेली. सहा वर्षांची मुलगी अनुश्री ही डोर्ली येथे आजी-आजोबाकडे राहते. गुरूवारी (दि. ५) सायंकाळी ७ : ३० वाजता गावात नामकरणाचा कार्यक्रम होता. किशोर हा जेवण करून घरी परत आला. तेव्हा मुलगी अनुश्री ही आजोबा दादाजी ठाकरे यांच्या खोलीत थांबली होती. तिला स्वतःच्या खोलीत बोलविल्यानंतर किशोर व वडिल दादाजी यांच्यात वाद झाला. वादाच्या भरात किशोरने लोखंडी सबलीने डोक्यावर वार केला. यात दादाजीचा जागीच मृत्यू झाला.
शेजारच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिल्याने ब्रह्मपुरी पोलिस तातडीने डोर्ली येथे दाखल झाले. आरोपी शिक्षक मुलाविरुद्ध कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद बानबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण करीत आहेत.

