चंद्रपूर:- सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेचा आदर्श जपत, 'खवातीन-ए-इस्लाम' संस्थेच्या वतीने येत्या ८ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे (इज्तेमाई निकाह) आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दादमहल वॉर्ड येथील कोहीनूर ग्राउंडवर सायंकाळी ७.०० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.
सलग आठवे वर्ष आणि १७ विवाह
या उपक्रमाचे हे सलग ८ वे वर्ष असून, यंदा १७ गरीब व गरजू कुटुंबातील जोडप्यांचे निकाह लावले जाणार आहेत. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'खवातीन-ए-इस्लाम' तर्फे नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या नव्या संसारासाठी लागणारी सर्व जीवनावश्यक सामुग्री भेट म्हणून दिली जाणार आहे.
५० हजार पाहुण्यांची मांदियाळी
या भव्य सोहळ्यासाठी ३० ते ५० हजार नागरिक आणि पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अध्यक्षांची माहिती
या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती देताना 'खवातीन-ए-इस्लाम'च्या अध्यक्षा सौ. शाहीन शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार मिळावा आणि विवाहाचा खर्च कमी करून एक चांगला पायंडा पाडावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

