Chandrapur News: चंद्रपुरात 'हाता'ला बळ; वडेट्टीवार-धानोरकर गटातील वाद अखेर मिटला!

Bhairav Diwase

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दोन्ही गट अखेर एकत्र आले आहेत.


आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेसच्या सर्व २७ नगरसेवकांनी एकत्र येत आपली अधिकृत गटनोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही गटांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे याआधी गटनोंदणी रखडली होती, मात्र दिल्ली हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर या वादावर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे.


या नव्या गटाच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापौरपद धानोरकर गटाकडे, तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे राहण्याचा 'फॉर्म्युला' ठरला आहे. यामुळे आता चंद्रपूर मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


काँग्रेसमधील या मनोमिलनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता लवकरच होणाऱ्या महापौर निवडणुकीत काँग्रेस आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे.