चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जुनोना आणि कारवा सफारीला आता नवा वेग मिळणार असून, या सफारीची धुरा आता महिलांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन संकुल मैदानावर सकाळी ११.०० वाजता एका दिमाखदार सोहळ्यात जिप्सीचे लोकार्पण पार पडले. चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते महिला बचत गटाला या जिप्सीची चाबी प्रदान करण्यात आली. खनिज विकास निधीतून घेण्यात आली आहे. यावेळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या जिप्सीच्या चालक आणि गाईड दोन्ही महिलाच असणार आहेत. यामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून, जुनोना-कारवा सफारीकडे पर्यटकांचा ओढा वाढण्यास मदत होणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल चंद्रपूरच्या व्याघ्र पर्यटनात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

