गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातून एक मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत सी-60 पथकाचे शूर जवान दीपक चिन्ना मडावी यांना वीरमरण आले आहे. अबुझमाडच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
अबुझमाड सीमेवर नक्षलविरोधी अभियान राबवत असताना सी-60 जवानांची नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक झाली. या मोहिमेदरम्यान ३८ वर्षीय जवान दीपक चिन्ना मडावी यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. आज पहाटे त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढून भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दीपक मडावी हे मूळचे मांड्रा (ता. अहेरी) येथील रहिवासी होते.
याच चकमकीत जोगा मडावी नावाचे दुसरे जवानही जखमी झाले आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलवण्यात येणार आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी आतापर्यंत एका महिला नक्षलवाद्यासह एकूण ३ मृतदेह हस्तगत केले आहेत. त्यांच्याकडून तातडीने १ एके-४७ आणि १ एसएलआर (SLR) बंदूक जप्त करण्यात आली आहे. अद्याप या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नसून परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून सी-60 जवानांनी हे धाडसी अभियान राबवले. दीपक मडावी यांच्या बलिदानाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासन आणि जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.

