चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या गटनेते पदावरून काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर थांबला आहे.
वादाची सुरुवात झाली जेव्हा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी १३ नगरसेवकांसह विभागीय आयुक्तांकडे सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड केली. मात्र, या निवडीला आमदार विजय वडेट्टीवार यांनी कडाडून विरोध केला होता. यानंतर दोन्ही गटांत नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आणि चंद्रपूरचे राजकारण चांगलेच तापले. हा वाद थेट दिल्ली दरबारी आणि प्रदेशाध्यक्षांकडे पोहोचला.
अखेर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केली आहे. वडेट्टीवार समर्थक राजेश अड्डूर यांची गटनेतेपदी नियुक्ती करून तसे अधिकृत पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता चंद्रपुरातील काँग्रेसमधील गटबाजी शमल्याचे चित्र आहे. सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार महापौरपद धानोरकर गटाकडे, तर गटनेता आणि उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

