चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीने आता नाट्यमय वळण घेतले आहे. एकीकडे भाजपने आपल्या अंतर्गत गटांमध्ये समन्वय साधून एकीचे प्रदर्शन केले असताना, दुसरीकडे सत्तेचा दावा करणाऱ्या काँग्रेसमध्ये मात्र 'गटबाजीचा स्फोट' झाला आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील वाद आता थेट उमेदवारी अर्जांपर्यंत पोहोचला आहे.
चंद्रपूर महापालिकेत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महापौर पद धानोरकर गटाला आणि उपमहापौर पद वडेट्टीवार गटाला देण्याचे निश्चित केले होते. मात्र, हा तोडगा कागदावरच राहिला. वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला असतानाच, धानोरकर गटाच्या राहुल चौधरी यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षश्रेष्ठींना उघड आव्हान दिले आहे.
|पक्ष/ गट
| काँग्रेस (धानोरकर गट) | महापौर उमेदवार संगिता भोयर, संगिता अमृतकर, सुनंदा धोबे, वैशाली महाडोळे |
उपमहापौर उमेदवार राहुल चौधरी |
| काँग्रेस (वडेट्टीवार गट) | -- | उपमहापौर उमेदवार वसंता देशमुख |
| भाजप |महापौर उमेदवार संगीता खांडेकर, (मुनगंटीवार समर्थक) | महापौर उमेदवार सरिका संदूरकर (जोरगेवार समर्थक) |
उपमहापौर उमेदवार संजय कंचर्लावार (जोरगेवार समर्थक) |
| शिवसेना (UBT) | महापौर उमेदवार मनस्वी संदीप गिऱ्हे |
उपमहापौर उमेदवार प्रशांत दानव |
| शेकाप (काँग्रेस मित्रपक्ष) | -- |उपमहापौर उमेदवार पप्पू देशमुख |
काँग्रेसमधील या गोंधळाचा फायदा घेण्यासाठी भाजपने सावध खेळी केली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना संधी देऊन भाजपने समन्वयाचे राजकारण साधले आहे. तर दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनस्वी गिऱ्हे यांनी "जो आम्हाला महापौर करेल, आम्ही त्यांच्यासोबत" अशी उघड भूमिका घेत किंगमेकर होण्याची तयारी दर्शवली आहे.
एकीकडे काँग्रेसचे ४ महापौर उमेदवार आणि मित्रपक्षासह ३ उपमहापौर उमेदवार मैदानात असल्याने मतांचे विभाजन होण्याचे भीती वर्तवली जात आहे. दिल्लीतील 'हायकमांड'चा आदेश धुडकावून लावणाऱ्या या नेत्यांमुळे आता महापालिकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

