Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

श्री. संत कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाची आजपासून सुरुवात #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी:- आत्म्याचे ज्ञान, आत्मबोध प्राप्त करण्याकरता अंतःकरणात अध्यात्म्याची जोड तेवत ठेवली पाहिजे, तर अज्ञानाचा अंधःकार दूर होऊ शकते. याकरिता स्थिर निश्चयाने ध्यान करावयास हवे. श्रवण, मनन, चिंतन अशी साधने एकवटून देह परमार्थाकडे वाटचाल करतो. तेव्हाच सद्गुच्या दर्शनाची प्रत्यक्षानुभुती लाभते, ही मौलिक शिकवण देणारे संत परमहंस कोंडय्या महाराज आज शरीर रूपाने आपल्यात नाहीत. पण त्यांच्या भक्तांनी त्यांची शिकवण आचरणात आणली आणि आत्मज्ञानाची ज्योत तेवत ठेवली . कोंडय्या स्वामींची योग समाधी ( इ . स .1939 ) निर्वाणाला 83 पूर्ण झाली. वर्षागणिक धाबा हे कोंडय्या महाराजांचे समाधी स्थळ गोंडपिपरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून पावन झालेले आहे.

महाराष्ट्र शासनानेही या तीर्थक्षेत्राची दखल घेतली असून, मदतीचा हात पुढे केला आहे. माघ शुद्ध तृतीयेला मल्लयाला तिसरे पुत्ररत्न झाले. त्याचे नाव कोंडय्या. जन्मापासून त्यांनी बाललीला दाखविणे सुरू केले. जन्मताच "कोंडय्या नमोः बसवय्या" असे बोलले, बालपणापासून योग अभ्यासात गर्क, मग्न असलेल्या कोंडय्यांनी वडिलांच्या आज्ञेप्रमाणे विवाह केला. पण पत्नीला त्यागून त्यांनी योगमार्ग पत्करला. ईश्वरी दृष्टांताने गुरु केला. कठोर व्रत व तप करीत त्यांनी गूळ व कडुलिंबाची पाने खाणे सुरू केले. योगमार्ग हीच त्यांची उपजीविका झाली. सगुण-निर्गुणाचा अनुभव घेऊन येत असताना कुचाळक्या उनाडक्या करणाऱ्या नास्तिकांनी त्यांची हेटाळणी केली.
ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली, रेड्याच्या मुखातून वेद म्हणविले तसे आपण दगडाच्या नंदीला चारा खाऊ घालून दाखवा, असे आवाहन दिले. आपली ही परीक्षा आहे असे समजून कोंडय्याने सर्वांसमक्ष दगडी नंदीला गवत चारले, अशी आख्यायिका आहे. या चमत्काराने कोंडय्या महाराज महायोगी असल्याची सर्वांना खात्री पटली आणि नास्तिकही आस्तिक झाले. कोंडयांच्या योग सामर्थ्याची सर्वांना प्रचिती येऊ लागली. पापाचे, चुकीचे प्रायश्चित केल्यानंतर महाराजांच्या कृपेने लोक सद्वर्तन करू लागते. त्यानंतर अनेक चमत्कार कोंडय्या स्वामींकडून घडू लागले. याचे सुरस वर्णन कोंडय्या विजय ग्रंथात आढळते.

जगाच्या कल्याणात संतांची विभूती याची प्रचिती कोंडय्याने दाखविली. कोडय्या स्वामीनी धाबा येथे मठात प्रवचन देणे सुरू केले होते. आपले अवतार कार्य संपत आल्याचे त्यांनी ओळखले. भक्तगण दूरवरून भेटीकरिता येत, चिंता करू लागले. कोंडय्यांनी त्यांच्या अंतरीची तळमळ हेरली. त्यांनी सांगितले. शरीर त्याग करणे मला क्रमप्राप्त आहे. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मी सदैव आहे आणि राहीन. मला येथेच ( धाबा ) समाधी द्या. एक दिनी नित्यक्रम आटोपून महाराज आसनावर बसले आणि नमोः बसवय्या म्हणत देह त्यागला. कोंडय्या स्वामींनी देह विसर्जन केला तो दिवस ( कार्तिक शुद्ध तृतीया ) 14 नोव्हेंबर 1939 रोज मंगळवार होता. दरवर्षी घाबा येथे या दिवसापासून कोंडय्या महाराजांची यात्रा भरते. भाविक येतात आणि सद्गुरू चरणी लीन होतात. तेलंगणा- महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थाना कोंडय्या महाराज देवस्थान आहे.

यात्रा कालावधीत भाविक मोठ्या संख्येने येतात.सहा दिवस विविध कार्यक्रम येथे होतात. यात्रा कालावधीत विविध दुकाने या परिसरात लागतात. सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. दरवर्षी मोठ्या श्रद्धेने भाविक धाबा येथे येतात‌ महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात. यावर्षी भव्य यात्रा महोत्सव दि. 19 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 पर्यंत आहे. महोत्सवाला मोठया संख्येने भेट दयावे.
श्री. अमर एम. बोडलावार
अध्यक्ष (श्री संत कों. म. स. धाबा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत