औरंगाबाद:- औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित विद्यार्थीनी चंद्रपुर जिल्ह्यातील आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्ती बुजाडे ही चार वर्षांपूर्वी विधी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आली होती. सध्या ती अंतिम वर्षाला होती. तीन महिन्यानंतर तिची परीक्षा असल्यामुळे त्याची ती तयारी करीत होती. मंगळवारी सकाळी ती विद्यापीठात गेली.
वर्गात हजेरी लावल्यानंतर वसतिगृहातील रुमवर परतली. रूममध्ये मित्रासोबत फोनवर बोलत असल्यामुळे रूममेट खोलीबाहेर गेली. काही वेळाने परत आल्यानंतरही तिला खोलीतून बोलण्याचा आवाज आला. त्यामुळे ती परत निघून गेली.
परंतु, अर्ध्यातासाने परत आल्यावर तिला आतून आवाज येत नव्हता आणि दरवाजा वाजविल्यानंतर प्रतिसादही मिळत नव्हता. तेव्हा तिने याविषयीची माहिती वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा युक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पाेलिस करीत आहेत.