शेतकऱ्याने ९ एकरातील सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्टर #chandrapur #Korpanaकोरपना:- शेतकऱ्याने सोयाबीनची लागवड केली. रोपटे फुलले… बहरले… डोलू लागले… समाधानकारक पीक हातात येईल, या आशेने शेतकरी आंनदीत झाला. अचानक यलो मोझॅक, खोडकिडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केले.दोन ते तीन दिवसात होत्याचे नव्हते झाले. सोयाबीनला शेंगा आहेत पण त्यामध्ये दाणे नाहीत. हातात येणारे सोयाबीन डोळ्यादेखत किडीने नष्ट झाल्याने हतबल झालेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील किरण शेंडे या शेतकऱ्याने तब्बल ९ एकरावरील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवून उरले सुरले पिकच नष्ट केले. सुमारे दोन लाख रुपये सोयाबीन लागवडीवर त्याने खर्च केला होता.


धानाला अल्प भाव, त्यातही किडींचा प्रादूर्भाव त्यामुळे पिकाच्या पेऱ्यात घट येवून सोयाबीनला अनुकूल वातावरण दिसू लागल्याने जिल्हाभरात सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर यावर्षी सोयाबीनची लागवड करण्यात आली. सोयाबीन पिकाचा सर्व हंगाम तयार केल्यानंतर बियाने लागवड करण्यात आली. रोपटे फुलले, बहरले, डोलू लागले होते. अख्खा हंगाम गेला पण किडीचा पत्ता नाही. परंतु अवघ्या काही दिवसात पिक हातात येणार होते तोवर अचानक येलो मोझॅक आणि खोडकिड्याने पिकांवर आक्रमण केले आणि शेतकऱ्यांच्या आनंदावर पाणी फेरले. अवघ्या दोन ते तीन दिवसातच किडीने पिक फस्त केले. अचानक किड लागल्याने शेतकऱ्यांनी पिक वाचविण्याकरीता पुरेपूर प्रयत्न केले. परंतु योग्य मार्गदर्शनाभावी पीक वाचविण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. त्यावर प्रचंड खर्चही झाला. परंतु यलो मोझॅक किडीचा बंदोबस्त शेतकरी करू शकले नाहीत.


कोरपना तालुक्यात २६ हजार हेक्टरमध्ये कापूस, साडेआठ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर तूर चार हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. सध्या शेतात सोयाबीन दिसत आहे. पण त्या सोयाबीन पिकाच्या शेंगाच भरलेल्या नाहीत. काही शेंगामध्ये दाणेच नाहीत. काहीमध्ये दाणे आहेत परंतु त्याचा आकार मुगाच्या आकाराएवढा आहे. कापसाची स्थिती वेगळी नाही. कापसाला बोंडच आले नाहीत. आले तेही नष्ट झाले आहेत. शेतीचा हंगाम लागवडीपासून तर आतापर्यंत पिकावर प्रचंड खर्च झाला. परंतु आता शेतातील सोयाबीन सवंगाला लागणारा खर्चही निघणार नसल्याने नारंडा येथील किरण या शेतकऱ्याने उद्गविग्न होवून तब्बल नऊ एकरात उभ्या सोयाबयीनवर ट्रॅक्टर फिरवून नष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या