ओबीसी बचाव परिषद 17 ला चंद्रपुरात #chandrapur #OBC

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जात समुदायाच्या प्रतिनिधींची 'ओबीसी बचाव परिषद' 17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे, अशी माहिती विदर्भवादी ओबीसी नेता डॉ. अशोक जीवतोडे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.

सध्या राज्यात मराठा आरक्षण या विषयावर जे वातावरण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज पेटून उठला आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत घटनादत्त ओबीसी समाजाचे अधिकार व हक्क प्रलंबित आहेत. ओबीसी समाजावर होणार्‍या अन्यायाविरोधात ओबीसी समाज व संघटना सातत्यपूर्ण लढा देत असूनही सध्या राज्यात सुरु असलेले वातावरण ओबीसी समाजाला डीवचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार ओबीसीतील सर्व जात समुहाने एकत्र येवून ओबीसींच्या सर्वंकष मागण्यांवर विचार मंथन करण्यात येणार आहे. याकरिता समाजातील जात संघटनांची मूठ बांधून ओबीसी संगठन आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने डॉ. अशोक जीवतोडे यांच्या सहभागातून ओबीसी बचाव परिषदच्या माध्यमातून सद्य परिस्थितीवर मंथन करण्यात येणार आहे. त्यानुसार ओबीसी समाजातील जातसंघटनेच्या चर्चेअंती संमत होणारे ठराव राज्य सरकारला व केंद्र सरकारला हिवाळी अधिवेशन दरम्यान देण्यात येणार आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची आरक्षणाबाबतची भूमिका वारंवार बदलताना दिसून येत आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या व ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या ही त्यांची मागणी ओबीसी समाजाचे नुकसान करणारी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून तर आजतागायत मराठा समाजाला राज्यात मिळालेल्या प्रतिनिधीत्वानंतरही आत्मचिंतन करण्याचे सोडून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांचे वक्तृत्व हे द्वेष व विरोध पसरविणारे आहे. ओबीसी नेते व राज्य सरकार विरोधात ते जे बोलतात त्या मागण्या या संविधानविरोधी आहेत. जो ओबीसी समाज नेहमी मराठा समाजासोबत राहिला आहे, त्याच ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खुपसण्याचा प्रयत्न जरांगे यांचा दिसतो आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला सतर्क व्हावे लागत आहे. ओबीसी समाजातील समस्त जातसमुदायाची ताकद व एकता दाखविण्याची ही वेळ आहे, असे मत डॉ. जीवतोडे यांनी यावेळी व्यक्त केले. ओबीसी समाजातील सर्व जातसमुदायाने एकत्र येवून आपली एकता व ताकद संपूर्ण देशाला दाखवावी, असे आवाहनही डॉ. जीवतोडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)