हृदयात शिवबा असू द्या! छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविणार:- ना मुनगंटीवार यांचा निर्धार #chandrapur #jantaRaja

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- स्वराज्याच्या रक्षणासाठी अठरापगड जातींना एकत्र आणून दडपशाहीविरूद्ध लढा देत आपल्याला अस्तित्व मिळवून देणाऱ्या शिवबाला सर्व विचारधारेच्या नागरिकांनी हृदयात स्थान द्यावे असे मार्मीक आवाहन करत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा 'जाणता राजा' या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे काल (शुक्रवारी) सांगितले.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर चार दिवस या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत झाला. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, सौ.सपना मुनगंटीवार,माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

'छत्रपती शिवरायांचे चरित्र आम्हाला कायम प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार महाराष्ट्रातच नाही तर देश-विदेशात पोहोचविण्याचा निर्धार आम्ही केला आहे. लंडनमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले १२ गडकिल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे किल्ले जागतिक यादीत समाविष्ठ होतील असा मला विश्वास आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातील हा ऐतिहासिक वारसा अभिमानाने बघेल याची मला खात्री आहे,' असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर येथे देखील शिवाजी महाराजांची सर्वात सुंदर प्रतिकृती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सातारा येथे देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना शिवाजी महाराजांच्या नावाचा सर्वात मोठा पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून रायगड येथे जलाभिषेक करण्यात आला. तसेच आग्रा येथील औरंगजेबाच्या दिवाण-ए-खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणे, अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे, प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला चांदीचे छत्र अर्पण करणे, रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर, "शिवकालीन होन" तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री. शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून भारतात आणण्याचा सामंजस्य करार, जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय सेनेच्या कॅम्पमध्ये बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आदी उपक्रम राबविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)