'जाणता राजा' प्रयोगाला हजारो चंद्रपूरकरांचा उदंड प्रतिसाद #chandrapur #Jantaraja

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडणाऱ्या 'जाणता राजा' या महानाट्याला जिल्ह्याच्या विविध भागातील जनतेने मोठ्या संख्येने हजेरी लावून उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांची अलोट गर्दी व 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी'चा गजर आसमंतात निनादला.

चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर चार दिवस या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत झाला.

शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या दिग्दर्शनात 'जाणता राजा' नाट्यकृतीची निर्मिती झाली होती. आतापर्यंत देशात व विदेशात शेकडो प्रयोग झाले आहेत. शिवछत्रपतींच्या पूर्वीचा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीत माजलेली अनागोंदी, शिवरायांचा जन्म, तरुण वयात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, प्रशासनावरची जरब, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, आग्र्यावरून झालेली सुटका, शिवरायांचा राज्याभिषेक आदी विविध घटनांना उजाळा देणारे प्रसंग यामध्ये जीवंत करण्यात आले आहे. प्रभावी संवाद, भव्य फिरत्या रंगमंचावर 200 पेक्षा अधिक कलाकार व तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रसंगानुरुप उभे करण्यात आलेले देखावे, विविध परंपरा व लोककलांचे सादरीकरण, घोडे, उंट असा लवाजमा, भव्यदिव्य नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत संयोजन व उत्तम संवादफेक प्रेक्षकांना भुरळ पाडणारे होते. तब्बल तीन तास प्रेक्षकांना महानाट्याने खिळवून ठेवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी प्रतिष्ठानचे अजित आपटे, महानाट्याचे दिग्दर्शक योगेश शिरोळे, नृत्य दिग्दर्शक प्रशांत चव्हाण, शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलावंत राहुल गांगल व शैलेश गंधारे, जिजाऊ साकारणाऱ्या साक्षी परकाळे तसेच शाहिर महेश आंबेकर यांचा यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)