Scam Alert: बॅंकेतून रक्‍कम हडपण्‍याची सायबर गुन्‍हेगारांची नवीन पद्धत! जाणून घ्या सविस्तर...

Bhairav Diwase

सायबर घोटाळेबाजांनी लोकांच्‍या बँक खात्‍यांतील पैसे उकळण्‍यासाठी फसवणुकीच्‍या नवीन पद्धती सिद्ध केल्‍या आहेत. आपल्‍या बँक खात्‍यात अनपेक्षितपणे पैसे जमा झाल्‍यास हुरळून जाऊ नका. कदाचित् तेच पैसे बँकेतील तुमचे सर्व पैसे हडपण्‍यासाठी कारणीभूत ठरू शकते, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांनी या फसवणुकीच्‍या प्रकाराला 'जंप्‌ड स्‍कॅम' असे नाव दिले आहे. फोन-पे, जी-पे, पे-टीएम्' यांसारख्‍या 'मोबाईल अ‍ॅप'च्‍या माध्‍यमातून पैशांचा व्‍यवहार करणार्‍यांनी सतर्कता बाळगण्‍याचा सल्ला त्‍यांनी दिला आहे.


सायबर भामट्यांनी अवलंबलेल्‍या फसवणुकीच्‍या एका नवीन युक्‍तीनुसार आधी ते एखाद्या बँक ग्राहकाच्‍या खात्‍यात छोटी रक्‍कम (अनमुाने ५ सहस्र रुपये) किंवा त्‍यापेक्षा अल्‍प रक्‍कम स्‍वत: जमा करतात. त्‍यानंतर अनोळखी व्‍यक्‍तीकडून त्‍या ग्राहकास भ्रमणभाष करण्‍यात येतो आणि त्‍याच्‍या खात्‍यात पैसा जमा केल्‍याचे सांगण्‍यात येते. ही रक्‍कम जमा करतांना एखाद्या 'बक्षिसाची रक्‍कम' यासारखी कारणे दिली जातात. हा सारा खटाटोप संबंधित ग्राहकाचा विश्‍वास संपादन करण्‍यासाठी असतो. त्‍यात बर्‍याच अंशी ते यशस्‍वीही होतात. रक्‍कम खरोखर पाठवलेली असते. त्‍यामुळे ग्राहक काहीही संशय घेत नाही.


ग्राहकाच्‍या भ्रमणभाषवर पैसे जमा झाल्‍याचा संदेश आला की, ग्राहक आनंदित होतो आणि बँकेतील स्‍वतःच्‍या खात्‍याची रक्‍कम पडताळण्‍याची इच्‍छा बाळगतो. त्‍यासाठी ग्राहक त्‍याचा 'पिन' (स्‍वत:चा गुप्‍त क्रमांक) टाकतो. तेथेच सायबर गुन्‍हेगारांंची योजना यशस्‍वी होते. ज्‍या क्षणी ग्राहक 'पिन' क्रमांक टाकतो, त्‍या क्षणी ग्राहक त्‍याच्‍या खात्‍यातून पैसे काढणीच्‍या अर्जाला मान्‍यता देतो. त्‍यानंतर ग्राहकाचे बँक खाते क्षणात रिकामे होते, अशी माहिती पोलिसांकडून प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. लहान रक्‍कम देऊन मोठ्या रकमेवर डल्ला मारण्‍याचा हा डाव असतो.

याविषयी सावधगिरी आणि उपाययोजना पोलिसांनी सूचवल्‍या आहेत. अशा प्रकारे स्‍वत:च्‍या खात्‍यात अनपेक्षित पैसे जमा झाल्‍यास आणि त्‍यासंबंधी अनोळखी व्‍यक्‍तीचा भ्रमणभाष आल्‍यास तिच्‍या सांगण्‍याला भुलू नये. तसेच लगेच 'पिन' क्रमांक टाकून खात्‍यात किती पैसे आहेत (किती बॅलन्‍स आहे), हे पडताळण्‍याची चूक करू नये. त्‍याही पुढे अशा प्रकारच्‍या फसवणुकीपासून वाचवण्‍यासाठी मुद्दाम चुकीचा 'पिन' क्रमांक टाकावा. तसे केल्‍याने सायबर भामट्यांकडून तुमचे पैसे लुटण्‍याचे प्रयत्न अयशस्‍वी होतील. त्‍यानंतर खरोखरच शिल्लक पडताळण्‍याची आवश्‍यकता असल्‍यास तसा प्रयत्न करू शकता, असे पोलिसांनी सूचित केले आहे.

या 'इलेक्‍ट्रॉनिक मनी ट्रान्‍स्‍फर' आणि 'कृत्रिम बुद्धीमत्ता' युगात या प्रकारच्‍या फसवणुकीपासून स्‍वतःचे संरक्षण करण्‍यासाठी प्रत्‍येकाने स्‍वत: दक्ष, सावध आणि जागृत रहावे अन् हाच संदेश आपले कुटुंबीय आणि सहकारी यांच्‍यापर्यंत पोचवून सायबर भामटेगिरीसंबंधी जागृती करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.