पुणे:- पुनर्विवाह करण्यासाठी एका संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढून ७२ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. पोलीस कारवाई करण्याची धमकी देत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Also Read:- "पुष्पा 2" प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
याप्रकरणी कर्वेनगर भागात राहणाऱ्याम एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. त्यांना पुनर्विवाह करायचा होता. त्याकरिता त्यांनी लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती.
सायबर चोरट्यांनी त्यांच्यांशी सोशल मिडियाद्वारे संपर्क साधला. त्यांच्यास ओळख वाढवीत एक अर्ज पाठविला. या अर्जामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती भरून घेण्यात आली. हा अर्ज त्यांनी भरून दिला. त्यानंतर, मनीषा शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधला.
त्यांच्याशी वारंवार संवाद (चॅटिंग) सुरू केला. त्यांना व्हिडिओ कॉलिंगदेखील केले. त्याद्वारे त्यांची अश्लील चित्रफीत तयार करण्यात आली. ही चित्रफीत सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. त्यावेळी, आरोपी शर्माचा साथीदार विक्रम राठोड याने फिर्यादीशी संपर्क साधला. त्यांना दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याची बतावणी केली.
शर्मा हिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर राहुल शर्मा याने त्यांच्याशी संपर्क साधत ही चित्रफीत सोशल मिडियात प्रसारित करण्याची धमकी दिली. स्वत:च्या बँक खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या फिर्यादीने आरोपीने सांगितल्याप्रमाणे पैसे खात्यावर पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता रोकडे तपास करत आहेत.