चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील उर्जानगर नेरी येथील वार्ड क्रमांक ६ मध्ये काल रात्री आगीचे लोट पाहायला मिळाले. एका अज्ञात व्यक्तीने कचरा डंपिंग ग्राऊंडला लावलेल्या आगीमुळे संपूर्ण गावाचा श्वास गुदमरला. या कचऱ्यात केवळ घरातील कचराच नाही, तर घातक ई-वेस्ट, मेडिकल वेस्ट आणि केमिकल वेस्टचा समावेश असल्याने ही आग अधिकच भयावह ठरली.
एकीकडे लहान मुले आणि वृद्ध नागरिक या धुरामुळे त्रस्त झाले असताना, स्थानिक सरपंच आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. पण म्हणतात ना, 'गाव करील ते राव काय करील!' चेतन चौधरी आणि कुलदीप भागडकर या तरुणांनी पुढाकार घेतला. ग्रामपंचायत सदस्य उषाताई आवळे आणि रिंकू सिंग मेहरा यांच्या मदतीने तब्बल २०० फूट पाईप जोडून रात्री ११ वाजेपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या मोहिमेत अनुज भागडकर, चैतन्य कुमरे, साहिल चौधरी आणि ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत रणवीर, दीपक आवळे यांच्यासह अनेक योद्ध्यांनी मोलाचे योगदान दिले.

