चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या एका शेतमजूर महिलेवर वाघाने झडप घालून तिला जागीच ठार केले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही भयानक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील आदर्श खेडा गावातील शेतशिवारात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता शामराव भोयर, वय ४५ वर्षे, असे मृतक मजूर महिलेचे नाव आहे. सुनीता या इतर मजुरांसोबत नेहमीप्रमाणे शेतात कापूस वेचण्याचे काम करत होत्या. दुपारच्या सुमारास, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुनीता यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेल्या इतर मजुरांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत वाघाने महिलेला ठार केले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.

