पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाचा कोप पाहायला मिळाला आहे. पोंभुर्णा तालुक्यात २३ फेब्रुवारीला झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर आणि मिरची यांसारखी पिके कापणीला आलेली असतानाच पावसाने त्यावर पाणी फेरले आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिके भरणीला आली होती. मात्र, दुपारी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे गहू आणि मका ही पिके पूर्णपणे जमिनीवर लोळली आहेत. हरभरा पिकात पाणी साचल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेला फटका बसला आहे, तर कापून ठेवलेली तूर पावसात भिजल्याने खराब होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, पोंभुर्णा भाजप तालुकाध्यक्ष आणि आष्ट्याचे माजी सरपंच हरीश ढवस यांनी पाऊल उचलले आहे. त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि पोंभुर्णा तहसीलदारांना लेखी निवेदन दिले असून, बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना भाजप जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, बंडू गौरकार, हरिश ढवस, राहुल संतोषवार, अल्का आत्राम, अजित मंगळगिरीवार, गुरुदास पिपरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



