चंद्रपूर:- 'काळ्या सोन्याचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात गेल्या आठवडाभरात गुन्हेगारीचा असा काही भस्मासुर संचारला आहे की, संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या चार वेगवेगळ्या घटनांत केवळ सात दिवसांत चार जणांचा बळी गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व घटनांमध्ये आरोपी हे जवळचे नातेवाईकच आहेत.
चंद्रपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. ज्या जिल्ह्यात माणुसकीचे गोडवे गाडले जातात, त्याच जिल्ह्यात गेल्या सात दिवसात रक्ताच्या नात्यांनीच एकमेकांचे रक्त सांडले आहे. एकामागून एक चार हत्यांच्या घटनांनी पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे. पहा आमचा विशेष रिपोर्ट... 'नाते की वैरी?'
चंद्रपूर जिल्ह्याला कुणाची नजर लागली आहे? की माणसातील माणूसकीच हरवत चालली आहे? गेल्या सात दिवसात जिल्ह्याच्या चार वेगवेगळ्या कोपऱ्यांतून हत्येच्या अशा बातम्या आल्या की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा येईल.
सुरुवात झाली मूल तालुक्यातील डोंगरगावमधून. इथे कारल्याच्या भाजीवरून झालेल्या वादात मुलाने आईला जागीच ठार केले. दारूच्या नशेत सारासार विचार विसरलेला हा मुलगा आता गजाआड आहे.
दुसरीकडे चिमूरच्या भिसीमध्ये एका मुलाने वडिलांच्या त्रासाला कंटाळून कायद्याला हातात घेतले. नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळला. इथे पीडितच आरोपी बनला.
गुन्हेगारीचे हे सत्र इथेच थांबले नाही. पोंभुर्ण्यात संशयाने एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा नाश केला. वहिनीवर संशय घेणाऱ्या दिराने तिला शेतात नेऊन कायमचे संपवले.
आणि काल भद्रावतीत संपत्तीच्या वादातून भावाने बहिणीचा गळा चिरला. या घटनेत आईही गंभीर जखमी झाली आहे.
१. मूलमध्ये कारल्याच्या भाजीवरून आईची हत्या:
डोंगरगाव येथे केवळ 'कारल्याची भाजी' का केली, या शुल्लक कारणावरून जगदीश पेटकुले या नराधम मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आई सुमित्रा पेटकुले हिला लाथाबुक्क्यांनी मारून ठार केले. दारूच्या नशेत केलेल्या या कृत्याने मातृप्रेमाला काळिमा फासला आहे.
२. चिमूरमध्ये वडिलांचा छळ अन् मुलाचा संताप:
भिसी येथे दारुड्या वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुलगा संदेश मेश्राम याने टोकाचे पाऊल उचलले. नायलॉन दोरीने गळा आवळून त्याने आपल्या जन्मदात्या पित्याचा अंत केला. मच्छिंद्र आनंदराव मेश्राम (वय ५१) असे मृत वडिलांचे नाव आहे.
३. पोंभुर्णा: अनैतिक संबंधाचा संशय आणि शेतात खून:
चेक खापरी येथे चुलत दिराने आपल्या वहिनीची गळा दाबून हत्या केली. संशयाचे भूत डोक्यात संचारल्याने भरवस्तीत नव्हे तर शेतात नेऊन हा क्रूर खेळ खेळला गेला. संजना थामदेव सोनटक्के वय (३२) रा. चेक खापरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर धनराज यादव सोनटक्के वय (३६) रा. चेक खापरी असे आरोपीचे नाव आहे.
४. भद्रावती: संपत्तीच्या वादातून बहिणीचा गळा चिरला:
भद्रावतीत संपत्तीच्या वादाने इतके रौद्र रूप धारण केले की, सूरज भोंडे या तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या केली आणि आईलाही गंभीर जखमी केले.
या सर्व घटनांमागे दारू, संशय आणि संपत्ती ही तीन प्रमुख कारणे समोर आली आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी, समाजात वाढणारी ही हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय बनली आहे. चंद्रपूरकर आता विचारत आहेत... नात्यांमधला ओलावा नक्की गेला कुठे?

