Chandrapur News: चंद्रपुरात काँग्रेसला 'हात' दाखवून वारजूरकर भाजपच्या वाटेवर?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला चंद्रपुरात मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


चंद्रपूर जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जातं, मात्र आता याच किल्ल्याचे बुरुज ढासळताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अविनाश वारजूरकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर हे लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


या दोन्ही नेत्यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भांगडिया यांनीच वारजूरकरांना भाजपच्या जवळ आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता जगजाहीर झाला असून, त्याचा फटका निष्ठवान कार्यकर्त्यांना बसत असल्याची भावना वारजूरकर गटात आहे.


जर वारजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर याचा थेट परिणाम चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघांवर होणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसची सत्ता धोक्यात येऊ शकते.