Chandrapur News: कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महाराष्ट्राच्या विधानसभेत आज एका अशा विषयावर चर्चा झाली, ज्याने माणुसकीला काळिमा फासला आहे. कर्जाचा डोंगर आणि सावकारांचा जाच सहन न झाल्याने चंद्रपूरच्या एका तरुण शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याची ही व्यथा आहे. केवळ १ लाखाच्या कर्जापोटी सावकाराने ७४ लाखांची मागणी केली. ट्रॅक्टर विकला, जमीन विकली, पण सावकाराचा हव्यास सुटला नाही. शेवटी किडनी विकण्याचा सल्लाही सावकारानेच दिला. विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आरोप केला की, हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असून शेतकऱ्याला परदेशात पाठवून त्याची किडनी काढण्यात आली.


हे केवळ सावकारी नाही, तर हे संघटित गुन्हेगारीचे रॅकेट आहे. यात दिल्लीतील एका पद्मश्री प्राप्त डॉक्टरचे नाव समोर येत आहे. अशा नराधमांना 'मकोका' (MCOCA) लावून जेलमध्ये सडवले पाहिजे. सरकारने या पीडित शेतकऱ्याला १० लाखांची तातडीची मदत द्यावी.


गृहराज्यमंत्र्यांनी यावर उत्तर देताना कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण प्रश्न हा उरतो की, 'बळीराजा' म्हणवल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला जर स्वतःचे अवयव विकून कर्ज फेडावे लागत असेल, तर आपण कोणत्या प्रगतीकडे जात आहोत? या रॅकेटमधील मोठे मासे गळाला लागणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.