चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणात असा काही 'उलटफेर' झाला की पाहणारे पाहतच राहिले! ज्या काँग्रेसला विजयाची खात्री होती, त्याच काँग्रेसच्या हातातून सत्तेचा घास हिरावून घेण्यात भाजपला यश आलंय. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला असून, या संपूर्ण सत्तांतराचे खरे सूत्रधार ठरलेत ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार!
निवडणुकीचे निकाल लागले तेव्हापासूनच चंद्रपूरची ही लढाई रोमांचक वळणावर होती. काँग्रेसकडे जास्त संख्याबळ असूनही त्यांच्यातील 'अंतर्गत वाद' भाजपसाठी संधी ठरला. वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील सुंदोपसुंदीचा अचूक अंदाज सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. शेवटच्या क्षणी त्यांनी अशा काही हालचाली केल्या की अख्खी राजकीय समीकरणं बदलून गेली.
मुनगंटीवारांनी केवळ रणनीतीच आखली नाही, तर महाविकास आघाडीत फूट पाडत ठाकरे गटाची साथ मिळवली. एका मताच्या फरकाने काँग्रेसचा पराभव झाला आणि संगीता खांडेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. चंद्रपूरच्या गल्लोगल्लीत आता एकच चर्चा आहे ती म्हणजे मुनगंटीवारांच्या राजकीय चातुर्याची!
मुनगंटीवारांना 'किंगमेकर' संबोधणारे फलक हातात झळकत होते. पार्श्वभूमीवर वाजणाऱ्या 'बाप तो बाप रहेंगा' या गाण्याने विरोधकांना जणू इशाराच दिला आहे. शांत आणि संयमी नेतृत्व करत मुनगंटीवारांनी दाखवून दिलं की, राजकारणात अनुभव आणि अचूक वेळ यालाच महत्त्व असतं.
थोडक्यात सांगायचं तर, चंद्रपूरच्या या लढाईत मुनगंटीवारांनी 'एकच वार' केला आणि सत्तेचा गड सर केला. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाने त्यांना रस्ता मोकळा करून दिला, पण त्या रस्त्यावरून सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचं काम मुनगंटीवारांच्या रणनीतीने केलं.

