चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेत जे घडले, ते एका कुशल राजकीय खेळीचा थरारक अध्याय होता. अवघ्या १२ तासांत आमदार किशोर जोरगेवार यांनी संपूर्ण खेळ उलटवून चंद्रपूरात भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान केला आणि राज्यभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.
सुरुवातीचे चित्र स्पष्ट होते. भाजपकडून महानगरपालिकेतील बहुमत जमविण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होती. कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, परस्पर अविश्वास आणि टोकाचे मतभेद पाहता “कॉंग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात आहे ही त्यांची विधाने राजकीयदृष्ट्या पटण्यासारखी होती. त्यामुळे भाजपचाच महापौर बसेल, अशी भावना बळावत गेली.
मात्र राजकारणात खात्रीला किंमत नसते. ऐनवेळी कॉंग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले. सत्ता स्थापनेचा आकडा जुळला आणि भाजपच्या हातून संधी निसटतेय, असे स्पष्ट दिसू लागले. याच टप्प्यावर मुनगंटीवार यांची माध्यमांपासून दूर राहण्याची भूमिका आणि त्यांची अनुपस्थिती भाजपच्या आत्मविश्वासाला धक्का देणारी ठरली. भाजप सत्तेबाहेर राहणार ही चर्चा शहरभर पसरली. आणि इथेच राजकारणाला कलाटणी मिळाली. कोणताही गोंगाट न करता, कोणतीही मोठी घोषणा न करता आमदार किशोर जोरगेवार यांनी निर्णायक पाऊल उचलले. महापौर निवडीच्या एक दिवस आधी भाजप गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांना व्हिप काढण्याचे आदेश देण्यात आले. स्पष्ट बहुमत नसताना काढलेला हा व्हिप म्हणजे एक राजकीय धाडस होते. पण तेच धाडस खेळ बदलणारे ठरले. या एका निर्णयाने संपूर्ण समीकरण ढवळून निघाले. उबाठा गटाची बार्गेनिंग पॉवर संपली. कॉंग्रेस आणि उबाठा गटात संभ्रम निर्माण झाला. भाजप कुणाच्या बळावर सत्ता स्थापणार? कुणाला बाहेर काढणार? या प्रश्नांनी दोन्ही गट अस्वस्थ झाले.
सत्तेतील वाटा वाचवण्यासाठी उबाठा गटाने अखेर एक पाऊल मागे घेत आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी थेट चर्चा सुरू केली. ही चर्चा केवळ स्थानिक नव्हती, तर ती राज्यपातळीवरील राजकीय समन्वयाशी जोडलेली होती. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या चर्चेनंतर जोरगेवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परिस्थितीची माहिती दिली, आणि ग्रीन सिग्नलनंतरच सत्तास्थापनेचा अंतिम अध्याय लिहिला गेला, अशी माहिती समोर येते. राजकारणात अनुभव महत्त्वाचा असतो, पण वेळीच घेतलेला निर्णय त्याहून अधिक महत्त्वाचा असतो. आवाज न करता खेळलेली चाल, विरोधकांच्या मनोवृत्तीचा अचूक अंदाज आणि निर्णायक क्षणी दाखवलेले धैर्य हेच ‘जोरगेवार मॉडेल’ आहे. चंद्रपूरच्या राजकारणात ही घटना दीर्घकाळ आठवली जाईल.

