Chandrapur News : चंद्रपूरचा गड जिंकला, पण श्रेयाचा धनी कोण?

Bhairav Diwase
मुनगंटीवारांचा 'वार' की जोरगेवारांचा 'मास्टरस्ट्रोक'?"
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत भाजपने आपला महापौर बसवण्यात यश मिळवलंय. पण या विजयासोबतच आता चंद्रपूर भाजपमध्ये एका नव्या युद्धाला तोंड फुटलंय, ते म्हणजे 'श्रेयवादाचं युद्ध'!

चंद्रपूरच्या राजकारणात सध्या एकाच प्रश्नाची चर्चा आहे – हा विजय नक्की कोणाचा? ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवून आपली रणनीती आखली होती. त्यांनी 'एकच वार' करत विरोधकांना चितपट केल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. मात्र, दुसरीकडे चित्र पालटल्याचं दिसतंय.

जेव्हा काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आणि भाजप सत्तेबाहेर जाणार असं वाटत होतं, तेव्हा मैदानात उतरले आमदार किशोर जोरगेवार. अवघ्या १२ तासांत त्यांनी चक्रं फिरवली. शिवसेनेच्या (UBT) गटाला सोबत घेत, मध्यरात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी सत्तासमीकरणं बदलली. याच 'जोरगेवार मॉडेल'मुळे आज संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्याचं बोललं जातंय.

विजय तर भाजपचा झाला, पण महापौरपदाच्या निवडीनंतर आता खऱ्या अर्थाने 'क्रेडिट वॉर'ला सुरुवात झाली आहे. मुनगंटीवारांचा अनुभव की जोरगेवारांचा मास्टरस्ट्रोक? चंद्रपूरची जनता आणि राजकीय विश्लेषक आता यावरच चर्चा करत आहेत.