चंद्रपूर:- गोंडपिपरी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्याच्या हालचाली प्रशासनाने तातडीने थांबवाव्यात, अशी ठाम भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या संयुक्त मोर्चाच्या मागणीची दखल घेत, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांची विशेष उपस्थिती होती. "शेतकऱ्यांचा कणा असलेली शेती उद्ध्वस्त करून लादलेला विकास आम्हाला कदापि मान्य नाही," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीमुळे अनेक अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. या जमिनी अत्यंत सुपीक असून त्यावर शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. केवळ उद्योगांच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करणे अन्यायकारक असून, प्रशासनाने बळजबरीने जमीन संपादन करण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. विकासाला विरोध नाही, मात्र तो करताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणे आवश्यक असून, सुपीक जमिनीऐवजी नापीक जमिनीचा पर्याय तपासावा, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या गंभीर विषयावर मार्ग काढण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेतला असून, येत्या २९ तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जमीन संपादनाबाबत सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
निवेदन देताना खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, संयुक्त मोर्चाचे पदाधिकारी आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. जर २९ तारखेच्या बैठकीत समाधानकारक निर्णय झाला नाही आणि प्रशासनाने जमीन संपादनाची प्रक्रिया स्थगित केली नाही, तर काँग्रेस पक्ष आणि संयुक्त मोर्चाच्या वतीने जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


