Chandrapur News: आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. रवींद्रपाल सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळला!

Bhairav Diwase
 
चंद्रपूर:- नागभीड येथील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून सोडले होते. या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट आता समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेल्या या किडनी रॅकेटचा मास्टरमाइंड मानला जाणारा डॉ. रवींद्रपाल सिंग आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डॉ. सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. तब्बल २० वेळा या अर्जावर सुनावणी झाली, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सोमवारी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. नागभीडच्या एका तरुणाची फसवणूक करून त्याची किडनी काढल्याचे हे प्रकरण केवळ स्थानिक नसून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.


जामीन नाकारला: न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. सिंगला दिलासा देण्यास नकार दिला.
पोलीस कारवाई: जामीन फेटाळताच स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक डॉ. सिंगच्या अटकेसाठी रवाना झाले आहे.


मोठ्या नावांचा उलगडा: डॉ. सिंग पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या काही बड्या डॉक्टरांची आणि मध्यस्थांची नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे.


डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अटकेनंतर या रॅकेटचे जाळे किती खोलवर पसरले आहे आणि यामध्ये आणखी किती तरुणांची फसवणूक झाली आहे, याचा उलगडा होणार आहे. पोलीस आता डॉ. सिंगला कधी आणि कुठून ताब्यात घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.