Chandrapur News: वर्धा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेले तीन जण बुडाले!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- कपडे धुण्यासाठी धानोरा गावाजवळ असलेल्या वर्धा नदी नदीवर गेलेल्या तिघांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण धानोरा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील राजू कोडापे (४० वर्षे), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (१२ वर्षे) आणि प्रियंका मडावी (१४ वर्षे) हे तिघेही आज सकाळच्या सुमारास वर्धा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्र, कपडे धूत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात ओढले गेले.


नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घुग्घुस पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली आहे.


सध्या नदीपात्रात मृतदेहांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कोडापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण धानोरा गाव या घटनेने सुन्न झाले आहे.