चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कपडे धुण्यासाठी वर्धा नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील दोघांसह एकूण तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण धानोरा गावावर शोककळा पसरली असून, अंधारामुळे आजची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा येथील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू कोडापे (४० वर्षे), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (१२ वर्षे) आणि त्यांची नातेवाईक प्रियंका मडावी (१४ वर्षे) हे तिघे आज दुपारी वर्धा नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेले होते. नदीकाठी काम करत असताना, या तिघांनाही पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. बघता बघता तिघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बाब गावकरी आणि पोलिसांच्या निदर्शनास येताच परिसरात खळबळ माजली.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक जीवरक्षक आणि पोलिसांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, दुर्दैवाने सायंकाळपर्यंत एकाचाही मृतदेह हाती लागलेला नाही. रात्रीचा अंधार आणि पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, प्रशासनाकडून आजची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. उद्या पहाटे पुन्हा नव्या जोमाने मृतदेहांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल होणार आहे. एकाच कुटुंबातील बाप-लेकीचा असा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


