चंद्रपूर:- शहरातील नागपूर रोडवर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या आम आदमी पक्षाने आज (०६ मे) सायंकाळी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन सादर केले. मागील एका महिन्यात वरोरा नाका ते लखमापूर परिसरात पाच ते सात नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच हे अपघात घडत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
काल याच रोडवर झालेल्या दोन स्वतंत्र अपघातांमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. रामनगर पोलीस ठाण्यासमोर आणि जनता कॉलेज चौकात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. या अपघातांमागे रस्त्यावरील बेसुमार अवैध पार्किंग, वाहतूक पोलिसांची एकतर्फी तैनाती आणि प्रशासकीय अनास्था हे मुख्य कारण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना १५ दिवसांपूर्वी तक्रार दिली असताना, त्यांनी "हे माझ्या कार्यक्षेत्रात नाही" अशी जबाबदारी झटकणारी भूमिका घेतली. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत दोन जीव गेले असून, मागील पाच वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात परिस्थिती सुधारली नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
आम आदमी पक्षाच्या प्रमुख मागण्या:
१. वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक पाटील यांची तात्काळ बदली करण्यात यावी.
२. नागपूर रोड, बंगाली कॅम्प रोड, तुकुम रोड, मगनया नाका व शहरातील मुख्य रस्ते अवैध पार्किंगमुक्त करण्यात यावेत.
३. संध्याकाळच्या वेळी नागपूर रोडवर विशेष वाहतूक पथक तैनात करावे.
४. जनता कॉलेज चौकासह प्रमुख चौकांमध्ये दोन्ही दिशांना ट्रॅफिक पोलीस तैनात करावेत.
५. अवैध पार्किंग करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
६. एसटी बस व खाजगी ट्रॅव्हल्सना चौकात थांबण्यास मनाई करावी.
७. मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही व स्पीड सेन्सर बसवण्यात यावेत.
जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारले असून लवकरात लवकर ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जर यावर योग्य कारवाई झाली नाही, तर आम आदमी पक्ष आंदोलन अधिक तीव्र करेल. या वेळी प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहराध्यक्ष योगेश गोखरे, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, विशाल बीरामवार व इम्रान शेख उपस्थित होते.


