Chandrapur News: उष्णतेचा चंद्रपूरकरांना मोठा फटका; सोहम बूटले यांच्याकडून महापालिका प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निवेदन

Bhairav Diwase


चंद्रपूर:- सध्या चंद्रपूर शहरात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, या भीषण उष्णतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे शहरात डिहायड्रेशन, हीट स्ट्रोक आणि गॅस्ट्रोसारख्या आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिक तसेच मुक्या प्राण्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोहम किरण सुदर्शन बूटले यांनी निवेदनाद्वारे महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

फॉगिंग मशीनची व्यवस्था: शहरातील प्रमुख चौकांमध्ये अधिक क्षमतेच्या आणि दर्जेदार वॉटर फॉगिंग मशिन्स बसवण्यात याव्यात. यापूर्वी जटपुरा गेट येथे लावण्यात आलेली व्यवस्था कुचकामी ठरल्याने यावेळी प्रभावी यंत्रणेचा वापर व्हावा.

पाणपोई आणि शुद्ध पाणी: नागरिकांच्या सोयीसाठी सर्व प्रमुख चौकात शुद्ध पिण्याच्या पाण्याची (पाणपोई) व्यवस्था करण्यात यावी. तसेच पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता नियमित तपासली जावी.

सावलीची सोय: नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी ग्रीन मॅट आणि तात्पुरत्या छतांची व्यवस्था करण्यात यावी.
पशुधनासाठी उपाय: उन्हामुळे भटक्या जनावरांना व पक्षांना पाण्याचा तुटवडा जाणवत असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र पाण्याची सोय करावी.

जनजागृती: उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक त्या सूचना, आपत्कालीन मदत क्रमांक आणि जनजागृती फलक प्रमुख ठिकाणी लावण्यात यावेत.

वाढत्या तापमानाचा फटका प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध, मजूर आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.