Chandrapur News: वर्धा नदीत ५ मित्र बुडाले; एकाचा मृतदेह हाती, चौघांचा शोध सुरू

Bhairav Diwase


चंद्रपूर:- वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरालगत असलेल्या माथारदेवी गावाजवळील नदी काठावर घडली. सम्यक देवराव सोनटक्के (18), संनी अशोक आस्मपेल्ली (19), रोहित बाबाराव बोबडे (19), शिव भास्कर केलझरकर (19), तन्मय नवनाथ पथाडे (18) असे मृतकाचे नाव असून हे युवक घुग्घूस शहरातील इंदिरा नगर परिसरातील रहिवाशी आहे. 

पाच युवक पोहण्यासाठी वर्धा नदीकाठी गेले होते. मात्र ते घरी परतले नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. नदीकाठी कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान बचाव पथकाला एका युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. 

अद्याप उर्वरित चार युवकांचा शोध सुरू असून पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. बेपत्ता सर्व युवकांचे वय अंदाजे १५ ते १९ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.