Pombhurna Fire News: पोंभूर्णा शहरात कचरा डेपोला आग; कचरा जळून खाक!

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा शहरात काल सायंकाळी नगरपंचायतीच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण कचरा जळून खाक झाला असून परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरले होते.

ही घटना पोंभूर्णा शहरातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयाजवळ घडली. रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक या कचरा डेपोमधून धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा निघताना नागरिकांना दिसल्या. लागलेली आग इतकी भीषण होती की काही वेळातच आग संपूर्ण परिसरात पसरली.
घटनास्थळी तात्काळ नगरपंचायतीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासांत या आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.