सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातल्या पळसगाव जाट येथे रविवारी सकाळी शेतात काम करत असताना एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. मात्र, संकटाच्या या काळात यमराज बनून आलेल्या बिबट्यासमोर एक पत्नी ढाल बनून उभी राहिली! तिच्या याच अचाट धैर्यामुळे पतीचा जीव थोडक्यात वाचला आहे.
पळसगाव जाट येथील रहिवासी महेंद्र मेघश्याम गायकवाड (वय ४५) हे रविवारी सकाळी आपली पत्नी पौर्णिमा गायकवाड यांच्यासोबत स्मशानभूमीजवळील शेतात काम करत होते. त्याचवेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने महेंद्र यांच्यावर अचानक झडप घातली. क्षणात काय घडले हे समजण्याच्या आत महेंद्र बिबट्याच्या विळख्यात सापडले होते.
पण पतीला संकटात पाहून पत्नी पौर्णिमा यांनी क्षणाचाही विलंब न लावता, हातात असलेले फावडे उचलले आणि बिबट्यावर जोरदार वार केला. या अनपेक्षित प्रतिकारामुळे बिबट्या क्षणभर मागे हटला. पण बिबट्याने पुन्हा एकदा महेंद्र यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. यावेळीही पौर्णिमा डगमगल्या नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा धैर्याने बिबट्याचा सामना केला आणि त्याला पळवून लावत पतीला सुरक्षित दूर नेले.
या थरारक हल्ल्यात महेंद्र गायकवाड हे सुदैवाने जखमी झाले असून, त्यांच्यावर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पळसगाव जाट परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात जाताना आता शेतकऱ्यांच्या जिवाला घोर लागला असून, वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.


