सिंदेवाही:- शेतकरी आधीच पावसाअभावी चिंतेत असताना, आता निसर्गाने शेतकऱ्यांवर आणखी एक निर्दयी घाला घातला आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पेरणीची योग्य वेळ हातातून निसटू नये म्हणून जीवाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या एका महिला शेतकऱ्यावर थेट वीज कोसळली आहे. या भीषण घटनेत महिला शेतकरी गंभीर जखमी झाली असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पावसाळ्याची सुरुवात झाली असली, तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच धास्तावला आहे. कसाबसा पाऊस येईल या आशेने पेरणीची वेळ निघून जाऊ नये म्हणून शेतकरी दिवसरात्र शेतात घाम गाळत आहेत. मात्र, रविवारी, म्हणजेच २८ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव (गन्ना) येथे निसर्गाने घात केला.
कळमगाव येथील सुरेखा देविदास पाकमोळे या आपल्या शेतात अन्य एका महिलेसोबत तुरीची लागवड करत होत्या. दोघींचेही काम वेगाने सुरू असतानाच, अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणांतच काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. वीज थेट सुरेखा पाकमोळे यांच्यावर कोसळली.
वीज कोसळताच सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने भीतीने आणि आक्रोशाने मदतीसाठी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करणारे इतर शेतकरी तातडीने मदतीसाठी धावले. गंभीर भाजलेल्या आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सुरेखा यांना तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

